कोल्हापूर: माझी आणि आमदार पी. एन. पाटील यांची चांगली मैत्री होती. त्यांच्या जाण्याने हा गट पोरका झाला. परंतु, तुम्हा सर्वांना वडीलकीच्या नात्याने पोरकेपणाची जाणीव होऊ देणार नाही. पी. एन. पाटील यांना भोगावती कारखान्याबद्दल प्रचंड आत्मीयता होती. या कारखान्याची ५,००० गाळप क्षमतेसह विस्तारवाढ, को-जनरेशन प्रकल्पासह डिस्टिलरी करूनच आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना भेट देणार आहोत, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कुरुकली येथे निगवे खालसा जिल्हा परिषदचे उमेदवार संदीप पाटील, पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग पाटील, परिते पंचायत समितीचे उमेदवार साताप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून हा पराभव भरून काढूया असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. तर राहुल पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीत एबी फॉर्म संदीप पाटील यांना दिला होता. त्यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांनी तो फॉर्म पी. एन. पाटील यांच्याकडे परत करत माझ्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. संदीप यांच्यासह सर्वच उमेदवारांच्या विजयी करून पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करू. यावेळी सरपंच रोहित पाटील, ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, दिगंबर मेडशिंगे आदी उपस्थित होते.

















