कोल्हापूर : कागलसह जिल्ह्यात ठिकठिकाणी ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने उभे पीक धोक्यात आले आहे. विशेषतः, खोडवा उसाला या किडीचा सर्वाधिक फटका बसत असून, वेळीच नियंत्रण न मिळवल्यास उत्पादनात घट होऊ शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
शेतात पाणी साचून राहणे, पावसाचा खंड पडल्यास पिकाला पाण्याचा ताण बसणे, नत्रयुक्त खतांचा असंतुलित वापर आणि खोडव्याचे अयोग्य नियोजन यासारख्या कारणांमुळे पांढऱ्या माशीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत याचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचतो, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर, कीटक शास्त्रज्ञ डॉ. अभयकुमार बागडे यांनी शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, कागल तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी नंद्याळ परिसरातील नुकसानग्रस्त ऊस पिकाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना न केल्यास या भागातील ऊस शेतीचे अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नियंत्रणासाठी काय करावे ?
शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
जैविक नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
लेकॅनासिलियम लेकॅनी या मित्रबुरशीची ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.