कोल्हापूर : ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरणारी एआय तंत्रप्रणाली शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबवण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. येथे श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व कृषी विज्ञान केंद्र (बारामती) यांच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमता आधारित ऊस उत्पादन तंत्र’ या विषयावरील चर्चा सत्रावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य साखर संघाच्या संचालिका व कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घाटगे म्हणाले, दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी संशोधन केंद्रातील अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याची निर्माण केलेली परंपरा त्यांच्या मागे अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाहू’ने कायम राखली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नाव नोंदणी करावी. कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे म्हणाले, एकीकडे उसाचा उत्पादन खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे अपेक्षित उत्पादकता मिळत नाही. त्यामुळे ऊस शेती किफायतशीर न होता तोट्याची होत चालली आहे. ऊस उत्पादन वाढीच्या अचूक नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे.
एआय तंत्रज्ञान शेतकरी व कारखान्यासही उपयुक्त : घाटगे
मर्यादित असलेल्या ऊस क्षेत्रात उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविल्याशिवाय ऊस शेती परवडणार नाही. एआय तंत्रामुळे उत्पादन खर्चात बचत होते, तर उसाच्या उत्पादनासह साखरेच्या उताऱ्यात वाढ होते. त्यामुळे शेतकरी व कारखाना अशा दोन्ही घटकांना हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन यावेळी घाटगे यांनी केले.