कोल्हापूर : दौलत कारखानाप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार – आमदार शिवाजी पाटील

कोल्हापूर : दौलत साखर कारखान्याच्या कामगारांना वेतन, वेतनवाढ, बोनस वेळेवर मिळणे गरजेचे आहे. कारखान्यामध्ये भूमीपुत्रांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका आमदार शिवाजी पाटील यांनी मांडली. हलकर्णी येथे दौलत कारखाना वाद मिटविण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. शेतकरी व कामगारांवर अरेरावी, दमदाटी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. कारखान्याच्या समस्यांबाबत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केंद्राकडूनही ‘दौलत’साठी विशेष पॅकेज मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले की, कामगार व अथर्व प्रशासनातील वादावर लवकर यशस्वी तोडगा काढू. हा कारखाना चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्याची अर्थवाहिनी आहे. कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी सरकारच्या विरोधातही आंदोलन करण्याची माझी तयारी आहे. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील आणि गोपाळराव पाटील यांनी साखर कारखान्याला गतवैभव मिळावे, अशा भावना व्यक्त केल्या. माजी आमदार राजेश पाटील यांनी दौलत कारखान्यातील मनमानी कारभाराला आळा घातला पाहिजे असे मत मांडले. यावेळी मल्लिकार्जुन मुगेरी, शांताराम पाटील, लक्ष्मण गावडे, नामदेव पाटील, रवींद्र बांदिवडेकर, भरमाण्णा गावडा, दिग्विजय देसाई, तानाजी गडकरी, अशोक जाधव, संजय पाटील, शंकर मनवाडकर, गोविंद पाटील, सुरेश हरेर, चंद्रशेखर गावडे, रवि नाईक, पांडुरंग बेनके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here