कोल्हापूर : कोल्हापूर येथे दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या कामगार व अथर्व प्रशासनाच्या बैठकीत समन्वयाने तोडगा काढण्यात आला होता. कामगारांच्या अकरा मागण्यांपैकी काही मागण्या या बैठकीतच मान्य झाल्या, तर उर्वरीत मागण्यांवर कामगार-प्रशासनाने एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार कारखाना प्रशासनाने बुधवारी बैठक बोलावली होती. त्याला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. आता गळीत हंगामाच्या तोंडावर कामगारांनी शिफ्टवर बहिष्कार टाकल्यामुळे हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत- अथर्व कारखान्यात पेच निर्माण झाला आहे.
गळीत हंगामाची तयारी पूर्ण झालेली असताना हा वाद निर्माण झाला आहे. गळीत हंगामासाठी तोडणी, वाहतूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, कामगारांनी शिफ्टमध्ये येण्यास नकार दिला. त्यामुळे कारखाना सुरू होऊ शकलेला नाही. सध्या ऊस तोडणीसाठी टोळ्या दाखल झाल्या आहेत. याचा फटका वाहतूकदारांना बसणार आहे. प्रशासन व कामगारांनी तातडीने तोडगा काढून कारखाना सुरू करावा, अशी मागणी वाहतूकदार रामा वांद्रे, संभाजी चोथे, सागर पाटील, जोतिबा पाटील, राणबा फडके, रमेश पाटील, राजू लांडे, कृष्णा पाटील आदींनी केली आहे.












