कोल्हापूर : सोनवणे-बांबवडे येथील अथणी शुगर्स युनिट उदय साखर कारखाना कामगारांनी वेतनवाढीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. दोन्ही प्रशासनाकडून योग्य मार्ग निघत नसल्याने उसाची वाहने अडवली आहेत. साखर संघाच्या नियमानुसार शंभर टक्के वेतन वाढ लागू करावी, हंगामी कर्मचाऱ्यांना रिटेन्शन वेतन मिळावे, कामानुसार हुद्देवाढ मिळावी, अशी आमची मागणी आहे, अशी माहिती कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी दीपक निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात अथणीचे प्रशासन व उदयचे प्रशासन यांनी जो निर्णय घेऊन करार केला, त्यावर संघाने स्वाक्षरी केल्या नाहीत असा दावा कारखान्याच्या प्रशासनाने केला आहे.
आंदोलनादरम्यान, कामगारांनी साखर कारखान्यास जाणारा रस्ता उकरून ऊस वाहतूक रोखून धरल्यामुळे महामार्गापर्यंत उसाच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड म्हणाले की, अथणी शुगर्सकडे कारखाना २०१४-१५ पासून भाडेतत्त्वावर दिल्यापासून दरवर्षी ठरलेल्या बोनसपेक्षा ज्यादा बोनस व नियमित पगार दिले जात आहेत. ज्यावर्षी गळीत हंगाम चांगला होत. त्यावेळी दुप्पट बोनसही दिला होता. प्रशासन कामगारांच्या हिताचे चांगले निर्णय घेत असताना कामगारांनी आडमुठे धोरण घेणे चुकीचे आहे. त्यांच्या मागण्या योग्य मार्गाने मान्य करण्यासाठी प्रयत्न करू. तर कारखान्याचे संचालक रणवीरसिंग गायकवाड म्हणाले की, दोन्ही प्रशासन मिळून योग्य तोडगा काढण्यास बांधील आहोत. कामगारांनी कारखान्याकडे जाणारा रस्ता रोखून धरून शेतकरी व सभासदांना वेठीस धरले आहे. हे योग्य नाही.
















