कोल्हापूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार यांची ‘भारतीय शुगर’ च्या एक्सिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर पदी (कार्यकारी मंडळ सदस्य) निवड झाली आहे. ‘भारतीय शुगर’ गेल्या पाच दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. सुतार गेल्या चार दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात योगदान देत आहेत, त्यांचा अनुभव, ज्ञान आणि कामाप्रति असलेल्या समर्पण भावनेमुळे त्यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे ‘भारतीय शुगर’ने म्हटले आहे. सुतार यांना आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना सहकार भूषण 2013 व ‘चिनीमंडी’ संस्थेमार्फत देश पातळीवरील एक्सलन्स इन मॅनेजमेंट फ्रॉम को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज इन इंडिया 2025 या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
सुतार यांनी सहकार कारखानदारीत तब्बल 39 वर्षे योगदान दिले आहे. प्रशासकीय कामकाज, आर्थिक शिस्त, तांत्रिक गुणवत्ता व पारदर्शक कारभार यावर त्यांचा साखर कारखानदारीतील मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी त्यांनी वसंतदादा सह. साखर काखाना, वारणा सह. साखर कारखाना, कर्मयोगी-इंदापूर, संजीवनी समूह येथे काम पाहिले आहे. या निवडीबाबत ‘चिनीमंडी’शी बोलताना श्री.बी.जी. सुतार यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी उभे आहे. सध्या साखर उद्योगासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी MSP मध्ये वाढ होणे गरजेचे आहे. या पदाच्या माध्यमातून साखर उद्योगासमोरील समस्या सोडवण्याबरोबरच सहकारी साखर उद्योगाला आणखीन वेगाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच सहकारी साखर कारखानदारीतील गतिमान प्रशासन, झिरो पेंडन्सी, लेस पेपर ऑफिस संकल्पना त्याचबरोबर कामगार सभासद व व्यवस्थापन यांचा योग्य समन्वय साधून सहकारातील संस्थांची प्रगती होण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.