लातूर : उसाचे गाळप वेळेत व्हावे म्हणून मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांच्या वतीने ऊस तोडणीचे यांत्रिकीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या १० हजार मुलांना रोजगार उपलब्ध होईल असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांनी केले. निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक झाली. त्यानंतर लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्यावतीने खरेदी केलेल्या १५ हार्वेस्टर व ३० इनफिल्डरचे पूजन कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देशमुख बोलत होते.
बैठकीत देशमुख यांनी यंदाच्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील उसाच्या गाळपाचे योग्य नियोजन करा. नियोजनाप्रमाणे ऊस तोडीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यात यावे. अधिकाधिक कार्यक्षमतेने कारखाना चालवून जास्तीत जास्त उसाचे गाळप करावे, अशा सूचना दिल्या. आमदार देशमुख म्हणाले की, यंदाच्या गळीत हंगामात अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेऊन अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करावे. यावेळी व्हाइस चेअरमन व माजी आमदार वैजनाथ शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, ट्वेंटी-वन शुगरचे व्हाइस चेअरमन विजय देशमुख, संचालक रवींद्र काळे आदी उपस्थित होते.