लातूर : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्य सक्षम करण्यासाठी मांजरा परिवार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आगामी काळात होणाऱ्या गळीत हंगामासाठी मांजरा साखर कारखान्याने ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आगामी गाळप हंगामात कारखाना ३,१५० रुपयांपेक्षा अधिक उच्चांकी भाव देईल, अशी घोषणा मांजरा कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी येथे केली. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते विलासराव देशमुख यांची दूरदृष्टी किती मोठी होती, याचा अंदाज ग्रामीण भागातील लोकांच्या झालेल्या प्रगतीत दिसून येतो असेही ते म्हणाले.
यावेळी अमित देशमुख म्हणाले की, मांजरा कारखाना गेल्या ४० वर्षांपासून अविरत शेतकरी सभासदांची सेवा करत आहे. त्यामुळे या काळात मांजरा कारखान्याचे नाते हे शेतकऱ्यांच्या चुलीशी जुळलेले आहे. यातूनच एकमेकांत विश्वासाचे नाते तयार झालेले आहे. धीरज देशमुख यांनी कधीकाळी आपण दुसऱ्या भागातील ऊस गाळप करण्यासाठी आणायचो. आता मात्र जिल्ह्यात जिकडे तिकडे उसाचे पीक दिसते. यासाठी आपल्या परिवाराने प्रचंड मेहनत व लोकांचा विश्वास संपादन केला आहे, हे विसरून चालणार नाही असे सांगितले. यावेळी लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, जगदीश बावणे, धनंजय देशमुख, अनंतराव देशमुख, श्याम भोसले, अशोक काळे, प्रमोद जाधव, विजय देशमुख, श्रीशैल्य उटगे, गणपतराव बाळ आदी उपस्थित होते.