लातूर : अतिवृष्टीमुळे उसाची वाढ खुंटली, एकरी उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात

लातूर : तेरणा नदीकाठ परिसरात गेल्या काही वर्षांत उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली होती. मात्र यंदा सततचा पाऊस, शेतात साचलेले पाणी आणि वाढलेली आर्द्रता यामुळे उसाच्या मुळांची कुज, कांड्यांची वाढ खुंटणे या कारणामुळे उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे. यंदा जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकरी उत्पादन ३० टनांपर्यंत घसरले आहे. दरवर्षी एकरी ५० ते ६० टन उत्पादन मिळत असताना यंदा उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकरी संकटात आहेत.

ऊस पिकासाठी एकरी खर्च साधारण ६५ ते ७५ हजार रुपयांपर्यंत जातो. साखर कारखान्यांचा दर सरासरी २,७०० रुपये प्रति टन धरला, तर एकरी ३० टन उत्पादनातून शेतकऱ्याला सुमारे ८१ हजार रुपये उत्पन्न मिळते. मात्र, खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात केवळ ६ ते १६ हजार रुपयेच शिल्लक राहत आहेत. वर्षभराची मेहनत पाहता ही रक्कम अत्यंत अपुरी आहे. कृषी सहायक प्रशांत सरवदे यांनी यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहिल्यामुळे उसाच्या मुळांची कुज, अन्नद्रव्यांचे वहन कमी होणे आणि कांड्यांची वाढ खुंटणे असे दुष्पःरिणाम दिसून आले. त्यामुळे उसाचे वजन आणि साखर उतारा दोन्ही घटले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here