लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्याची दिवाळखोरी व दुसऱ्या कंपनीच्या विक्रीवर शंका व्यक्त केल्या जात आहेत. विमल ॲग्रो कंपनीने कारखाना घेतला आहे. कंपनीने पूर्वीच्या एकाही कर्मचाऱ्याला कामावर न घेता गळीत हंगामाची तयारी सुरू केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. पूर्वीची शेतकरी व कर्मचाऱ्यांची देणी कोण फेडणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कर्मचारी व शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात यासाठी दोन वेळा आंदोलनही केले. ही देणी कोण फेडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळखोरी व विक्रीबाबत नेमके काय झाले असा प्रश्न आहे. दरम्यान शेतकरी व कर्मचारी आज, कारखान्यासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करणार आहेत.
पन्नगेश्वर कारखाना तेवीस वर्षांनंतर दिवाळखोरीत गेला आणि त्याची विक्री झाली. विमल ॲग्रो कंपनीने विकत घेतलेल्या या कारखान्याच्या गळीत हंगाम तयारीवेळी हा प्रकार उघड झाला. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने सन २००० मध्ये पन्नगेश्वर कारखान्याची उभारणी केली. वीस वर्षे कारखाना जोमात सुरू राहिला. त्यांच्या निधनानंतर कारखान्याला उतरती कळा लागली. २०२४ मध्ये कारखाना बंद पडला. कारखाना दिवाळखोरीत निघाल्यानंतर कर्ज दिलेल्या बँकांनी राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरणात (एनसीएलटी) धाव घेतली. यांदरम्यान, कारखान्याकडे बँकांचे ४६ कोटी आणि मोजक्याच कर्मचाऱ्यांचे दोन कोटी देणे दाखवले. कारखान्याची ४८ कोटींना विक्री विमल ॲग्रो कंपनीला झाल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांची देणी, शेतकऱ्यांनी शेवटच्या हंगामात शेवटच्या पंधरा दिवसांत केलेल्या ऊस पुरवठ्याचे पैसे शेअर्स रक्कम व वाहतूक तसेच तोडणी वाहतूकदारांची देणी तशीच आहेत. याप्रश्नी सर्वांचे पैसे मिळेपर्यंत आम्ही लढा देत राहू, असे मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले.