लातूर : जय जवान साखर कारखाना बंद पडल्याने शेतकऱ्यांची कोंडी

लातूर : सहकार मंत्र्यांच्या मतदारसंघातील बंद पडलेल्या चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्याचे यावर्षी तरी बॉयलर पेटणार का ? असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे. गेल्या १५ वर्षापासून कारखाना बंद पडला आहे. सुरुवातीच्या काळात राज्यात नावाजलेल्या मोजक्या कारखानदारीत या कारखान्याचेही नाव होते. कारखाना साखर उताऱ्यासाठी प्रसिद्ध होता. कारखाना बंद असल्यामुळे चाकूर, अहमदपूर, उदगीर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. तर कामगारही देशोधडीला लागले आहेत. नेतृत्वाअभावी बंद पडलेल्या या कारखान्याचा वनवास कधी संपणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या संकल्पनेतून नळेगाव येथे १९८४ साली जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना उभा करण्यात आला होता. जवळपास ३० वर्षे कारखाना सुरळीत होता. नंतर १५ वर्षांपासून कारखाना काही तांत्रिक कारणामुळे बंद पडला. कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज आहे. कर्ज थकल्याने बँकेने कारखाना ताब्यात घेतला आहे. १० हजार शेतकरी सभासद, २९८ गावे, ७ तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला १२ हजार ५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला कारखाना जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कारखान्याला जवळपास ३०० एकर जमीन आहे. कारखान्यात ३०० कामगार होते. कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कारखाना चालू करावा, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here