लातूर : पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिल्स हा कारखाना विमल अग्रोने विकत घेतला आहे. कारखान्याकडील थकीत ऊस बिले व कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच इतर प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात कारखाना कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, शेअर्स धारक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता निघालेला मोर्चा ११.३० वाजता थेट पन्नगेश्वर साखर कारखान्यावर येऊन धडकला. या ठिकाणी हजारोंच्या मोर्चेकऱ्यांच्या उपस्थितीत तब्बल ३ तास आमच्या मागण्या मान्य करा आशा घोषणा देत शेतकऱ्यांनी कारखाना गेटवर ठिय्या आंदोलन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दि. ११ रोजी पानगाव येथील गांधी चौक ते पन्नगेश्वर साखर कारखाना असा मोर्चा काढण्यात आला. कारखाना विक्री झाल्याने शेतकऱ्यांचे शेअर्स बुडीत निघाले. ते शेअर्स कायम करावेत, कारखान्याने कर्मचाऱ्यांचे पीएफ, ग्रॅज्युइटी, थकीत राहिलेले वेतन देण्यात यावे, तोडणी वाहतुक ठेकेदार व थकीत ऊस बिलाची रक्कम देण्यात यावी आदी मागण्यात करण्यात आल्या. आंदोलन स्थळी कारखान्याचे सरव्यवस्थापक व्यंकट वाकडे यांनी निवेदन स्वीकारले येत्या चार दिवसात या विषयावर निर्णय देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कार्यकर्ते, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.