लातूर : हार्वेस्टरने ऊस तोडणीचा शेतकऱ्यांना सहा ते सात हजार रुपयांना फटका

लातूर : ऊस तोडणी मजुरांची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या, वाचणारा वेळ आदी प्रश्नांना उत्तर म्हणून काही वर्षांपासून तोडणीसाठी कारखान्यांकडून ऊसतोडणी (केन हार्वेस्टर) यंत्रांचा वापर वाढला आहे. मात्र, आता या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही येत आहेत. तसेच, जनावरांसाठी पूर्वी उपलब्ध होणारे वाडेही (चारा) आता दुरापास्त झाल्याने दुधाचा जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. सोबतच यंत्रांमुळे शंभर टक्के उसाची तोड होत नसल्याच्याही तक्रारी शेतकरी करत आहेत. हार्वेस्टर तोडणीसाठी ऑपरेटरसह इतर ठिकाणी पैसे खर्च करावे लागत असल्याने शेतकऱ्यांना एकरी सहा ते सात हजारांचा फटका बसत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. ९० ते ९५ टक्के उसाची तोडणी ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टर) होत आहे. मात्र, ऊस तोडणी यंत्रांकडून होणारे पीक नुकसान आणि चालक-मालकांच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी साखर कारखानदारांनी घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हार्वेस्टर तोडणीवेळी कडेचा ऊस तसाच शिल्लक राहतो. पाचटामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस पडतो. हा ऊस तोडून-वेचून हार्वेस्टरमध्ये टाकण्यासाठी किंवा कारखान्याला पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा खर्च करावा लागत आहे. तोडणीनंतर एकरी दोन ते तीन टन ऊस वावरात निघत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पूर्वीची मजुरांची तोडणी परवडणारी होती, असे शेतकरी सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here