लातूर : तळेगाव भो. (ता. देवणी) येथील जागृती शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (ता. २७) नागराळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कारखानास्थळी ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, लसीकरण व सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरास ऊसतोड मजुरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ऊसतोड मजुरांची कारखानास्थळी व प्रत्यक्ष ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणी फिल्डवर जाऊन मोफत आरोग्य तपासणी व ऊसतोड मजुरांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने महिला ऊसतोड मजुरांना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली शिंदे, डॉ. स्वप्नील एकघरे, डॉ. दत्ता जाधव, कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम हिबाने व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले, मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम, मुख्य अभियंताअतुल दरेकर, ज्ञानेश्वर जाधव, आसवनी इंन्चार्ज विलास पाटील, ऊस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिरादार व रामदास सोळुंके, कार्यालय अधीक्षक राजकुमार कांबळे, कृषी पर्यवेक्षक महेश भंडे यांच्यासह कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


















