लातूर : तळेगांव (भो.) येथील जागृती शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज या कारखान्याकडून गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस वाहतुक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर यांना रिफ्लेक्टर बोर्ड, रिफ्लेक्टर टेपचे वाटप करण्यात आले. रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने, रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी लातूर विभागाच्या मोटार वाहन निरिक्षकांनी वाहन चालकांना रस्त्यावरील होणारे अपघात, रस्ते सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. परिवहन विभागाचे सुनिल गिते व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले, मुख्य शेती अधिकारी रामानंद कदम, मुख्य अभियंता अतुल दरेकर, उपअभियंता अक्षय सुर्यवंशी, मुख्य रसायनतज्ञ ज्ञानेश्वर जाधव, आसवणी इन्चार्ज विलास पाटील, ऊस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिरादार व रामदास सोळुंके, सुरक्षा अधिकारी रत्नकांत कुरवडे, कार्यालय अधीक्षक (शेती) राजकुमार कांबळे, केनयार्ड सुपरवाझर विशाल सांडूर यांच्यासह ऊस वाहतूक करणारे वाहन चालक, मालक उपस्थित होते.
यावेळी वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १०४ नुसार साखर कारखान्यांवर ऊस वाहतूक करणारे सर्व ट्रक, मोठे ट्रॅक्टर-ट्रेलर, छोटे ट्रॅक्टर-ट्रेलर यांना रिफ्लेक्टर बोर्ड, रिफ्लेक्टर टेप बसविणे बंधनकारक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड, टेप नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. कायद्यानुसार अशा वाहनधारकांना दंड होऊ शकतो. वाहनामध्ये मोठ्या आवाजात म्युजिक सिस्टीम लावू नये. वाहन चालकांकडे विमा, वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. वाहन नादुरूस्त असल्यास रस्त्यात लावू नये व रस्त्यात टाकलेले दगड झाडांच्या फांदया बाजूला टाकणे या नियमांचे तंतोतंत पालन करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


















