लातूर : किल्लारी साखर कारखाना यंदा करणार ३ लाख टन ऊस गाळप

किल्लारी : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्यात रविवारी नवीन मशिनरी उभारणी प्रारंभ व पूजनाचा कार्यक्रम दत्तात्रय पवार व ॲड. परीक्षित पवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांनी भ्रमणध्वनीवरून उपस्थितांशी संवाद साधला. या भागातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना सुरू होणे आवश्यक होते. त्यात सहकारी तत्त्वावर सुरू करणे हे खूप आव्हानात्मक होते. केंद्रीयमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यावर्षी ऊस चांगला आहे. आधुनिकीकरणासह साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन १,२५० टनांवरून २,५०० टन इतकी करण्यात आली आहे. नव्या हंगामात ३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची घोषणा यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.

कारखाना प्रशासनाने नेमलेल्या संबंधित एजन्सीने विस्तारीकरणाची कामे पूर्ण केली. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थाचे प्रवीण फडणीस व छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे समृत जाधव यांनी किल्लारी कारखान्याचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाला संतोष बेंबडे, सुजित शास्त्री, व्हीएसआयचे एम. डी. जय गोरे, कार्यकारी संचालक डी. एल. पतंगे, सहायक तुकाराम पवार खातेप्रमुख तसेच श्रीराम पाटील, बळिराम पाटील, युवराज बिराजदार, बालाजी निकम, जयपाल भोसले, गणेश माने, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर बालकुंदे, ईश्वर दंडगुले, सतीश भोसले, गोविंद भोसले, हर्सल देशमुख यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here