लातूर : किल्लारी साखर कारखान्याची साखर उताऱ्यातही भरारी, मिळवला १२.५ टक्के उतारा

लातूर: किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात दमदार कामगिरी करत २ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा यशस्वीरीत्या मंगळवारी, दि. १० रोजी पूर्ण केला. कारखान्याने या हंगामात १२.५ टक्के सरासरी साखर उतारा मिळवला आहे. कारखान्याचे हे यश तांत्रिक नियोजन, आधुनिक यंत्रसामग्रीचा योग्य वापर, अनुभवी कर्मचारी वर्ग आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. अनेक अडचणींवर मात करत पुन्हा सुरू झालेला हा कारखाना यंदाच्या गळीत हंगामात तीन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण करेल, असा विश्वास व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केला आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या या कारखान्याने प्रतिटन २७०० रुपये दराने पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यामुळे आणि स्थानिक नेतृत्वाच्या पाठबळामुळे कारखान्याने नव्या दमाने वाटचाल सुरू केली आहे. ऊस तोडणी, वाहतूक आणि गाळप या सर्व प्रक्रिया काटेकोर नियोजनाने राबविण्यात आल्याने कोणताही मोठा अडथळा न येता गाळप वेळेत पूर्ण करण्यात आले. पुढील काळात साखर उत्पादनासोबतच उपपदार्थ निर्मिती, आर्थिक शिस्त आणि कार्यक्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले. सभासद शेतकऱ्यांचा विश्वास जपत कारखान्याची प्रगती अधिक वेगाने साधण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here