लातूर : मांजरा साखर कारखान्याचा ऊस गाळप, साखर उताऱ्यात विक्रम – अध्यक्ष सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

लातूर : मांजरा साखर कारखान्याने ऊस गाळप, साखर उत्पादन, इथेनॉल उत्पादन आणि वीज निर्मितीसह सहवीज निर्मिती प्रकल्पानेदेखील चांगली कामगिरी केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष आणि मांजरा कुटुंबाचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे शक्य झाले, अशा भावना कारखान्याच्या संचालक मंडळाने व्यक्त केल्या. कारखान्याकडे चालू गळीत हंगामात एकूण १९,३६१.३३ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. कारखान्याचे ऊस गाळप ७ मार्च २०२६ रोजी संपुष्टात आले. या हंगामात कारखान्याने एकूण ७१५,४०९.४३५ मेट्रिक टन ऊस गाळप केले. त्यातून ५८८,५४० क्विंटल साखर उत्पादन झाले. बी-हेवी आणि सिरपसह सरासरी साखर रिकव्हरी १२.३० टक्के नोंदवली गेली. हा साखर उतारा आजघडीला सर्वाधिक आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमाला सपीठावर उपाध्यक्ष अशोकराव काळे, कृषी समितीचे सभापती कैलास पाटील, मदन भिसे, नवनाथ काळे, वसंत उपाडे, धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख, भैरू कदम, सदाशिव कदम, नीळकंठ बचाटे, दयानंद बिडवे आदी उपस्थित होते. कारखान्याच्या सूत्रांनी सांगितले की, सह वीज-निर्मिती प्रकल्पाने एकूण ४८,८११,००० किलोवॅट प्रति तास वीज निर्मिती केली. यापैकी २२,६०१,९५० किलोवॅट प्रति तास कारखान्यानेच वापरली, तर २६,२०९,०५० किलोवॅट प्रति तास वीज वितरण कंपनीला पुरवण्यात आली. कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाने एकूण १२,७७९,७४१ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here