लातूर : गेली अनेक वर्षे बंद असलेला आणि मोडकळीस आलेला बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना सहकारमहर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा नव्याने झेप घेत आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन २,८११ रुपये ऊस दर दिला आहे. गुरुवारी कारखान्यातर्फे १११ रुपयांचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. मांजरा साखर परिवारातील या कारखान्याने अडचणींवर मात करीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जोरात वाटचाल सुरू ठेवली आहे. पुढील हंगामापासून कारखान्यात डिस्टलरी प्रकल्प सुरू करण्याचा मानस असल्याचे कारखान्याचे चेअरमन शाम भोसले यांनी सांगितले.
बेलकुंड आणि परिसरातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे यासाठी विलासराव देशमुख यांनी उभारलेला हा कारखाना वाचविण्याचा प्रयत्न मांजरा परिवाराने केला आहे. दिलीपराव देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या मदतीने तर शासन दरबारी अमित देशमुख व भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी कर्ज व अवसायानात पडलेला हा साखर कारखाना ताकदीने उभा राहाण्यासाठी मदत केली. कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट करणे जिकरीचे होते. त्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून धीरज देशमुख यांनी आर्थिक आधार दिला. आता कारखाना प्रतिदिन अडीच हजार टन गाळप करीत आहे. यंदा एक लाख एक हजार टन उसाचे गाळप करण्यात आला असून पहिली उचल २,७०० देण्यात आली होती. गुरुवारी आणखी १११ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.