लातूर : औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कारखान्यात दररोज सरासरी २८०० ते २९०० मेट्रिक टन प्रति दिन इतक्या क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे. विशेष म्हणजे, यंदा साखर उताराही चांगला मिळत असल्याने कारखान्याच्या आर्थिक स्थितीला भक्कम आधार मिळाला आहे.
ज्या शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शिल्लक आहे, त्यांनी कोणतीही चिंता करू नये. शेवटच्या शेतकऱ्याचा ऊस गाळप होईपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहे, असे आश्वासन कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादकांना दिले आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली कामगार, अधिकारी आणि संचालक मंडळाने एकसंघपणे केलेल्या प्रयत्नांमुळे कारखान्याला हे यश असल्याची शेतकऱ्यांत भावना आहे. काटेकोर नियोजन, आधुनिक यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर आणि शेतकरी व कारखाना प्रशासनातील उत्तम समन्वयामुळे हे उद्दिष्ट वेळेत साध्य झाले असे प्रशासनाने सांगितले.
















