लातूर : पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, शेतकऱ्यांच्या शेअर्सची रक्कम, ऊसतोड कामगारांचे थकीत पैसे मिळण्यासाठी कारखाना गेटसमोर वारंवार साखळी उपोषण, धरणे आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलन केले. शिवाय हजारो कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. तरीही हा प्रश्न सुटला नसल्याने पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी ता. २५) रेणा मध्यम प्रकल्पात प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले.
आंदोलनस्थळी एनडीआरएफ, अग्निशामक दलाचे पथक तैनात होते. चाकूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्माचाऱ्यांनी १३ ऑगस्टपासून गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पानगाव येथून साखर कारखान्याच्या कामगारांनी दुचाकीवर येऊन सोमवारी हे आंदोलन केले. कारखान्याने लवकर पैसे न दिल्यास कुटुंबीयांसह जल समाधी घेण्यात येईल, असा इशारा पन्नगेश्वर साखर कारखाना संघर्ष कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आला. यावेळी आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.