लातूर : थकीत देणे देऊन कामगारांना कामावर घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिल्समधील कामगारांनी कारखान्याच्या मुख्य गेटवरच बुधवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. याबाबत विमल अग्रो कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलेले आश्वासन पाळलेले नाही. आंदोलन केले तरी मागणीचे निवेदन सरव्यवस्थापक घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे १३ ऑगस्टपासून मुख्य गेटसमोर साखळी उपोषण करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. कामगारांच्या हक्काची थकीत रक्कम न देता कारखान्याची विक्री व हस्तांतरण करण्यात आले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
याबाबत कामगारांनी स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची तरतूद न करता अंबाजोगाई येथील विमल ॲग्रो फुड्स या कंपनीस कवडीमोल किमतीत कारखान्याची विक्री करण्यात आली. आंदोलनाला बसलेले हे सर्व कर्मचारी पन्नगेश्वर शुगर मिल्समध्ये स्थापनेपासून कामाला आहेत. त्यांचे कारखान्याकडे तीन वर्षांचे पगार, ग्रॅज्युटी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येणे बाकी आहे. इतकी वर्षे पगार न मिळाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. पूर्वीच्या व्यवस्थापनाने आंदोलने करूनदेखील मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कारखाना विक्रीची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी १४ मेपासून कारखान्याच्या मुख्य गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले. २९ मे रोजी विमल ॲग्रो कंपनी कारखान्याचा ताबा घेण्यास आली असता त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करत मागील थकीत देणे देऊन कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळलेले नाही.