लातूर : उजना येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्याच्या वतीने वर्ष २०२५ – २६ च्या गळीत हंगामासाठी नियोजन सुरू झाले आहे. कारखान्यात सोमवारी माजी मंत्री बाळासाहेब जाधव व प्रगतशील शेतकरी उद्धवराव इप्पर यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणास गेलेल्या नामदेव माकणे, अजय जाधव (नागठाणा), नारायण सूर्यवंशी (माकणी), अतुल घाटीवाले (उजना), नामदेव बडगिरे (थोडगावाडी), किशोर लोहकरे (मोघा), नामदेव कदम (तांबट सांगवी) या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याने ६.४० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती माजी मंत्री जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले की, यावर्षीच्या मे महिन्यातील पावसाने उसाच्या उपयुक्त वाढीमध्ये मदत झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात अधिकाधिक भर कशी पडेल याकडे कारखान्याच्यावतीने लक्ष दिले जाणार आहे. कारखाना परिसरात दोन ते तीन किलोमीटर अंतरातील २४ ऊस उत्पादक सभासदांची निवड केली आहे. तेथे हवामानाची माहिती देणारे यंत्र उभारले जाणार आहे. त्या आधारे शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जाईल. या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष पी. जी. होनराव, महाव्यवस्थापक एस. आर. पिसाळ, बी. के. कावलगुडेकर, पी. एल. मिटकर आदींची उपस्थिती होती.