लातूर : साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी मांजरा परिवारातील साखर उद्योगात कार्यरत राहिलेले कार्यकारी संचालक एस. डी. बोखारे यांची बहुमताने निवड झाली. त्यांची ही निवड मतदानाने झाली. एकुण झालेल्या मतापैकी बोखारे यांना १९ मते मिळाली. तर डॉ. मोहन डोंगरे यांना शुन्य मते मिळाली. २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. यापूर्वी बोखारे यांनी २०२२ ते २०२५ या कालावधीत या संस्थेवर उपाध्यक्ष (तांत्रिक) म्हणूनही काम पाहिले आहे.
कार्यकारी संचालक बोखारे यांना विविध साखर कारखान्यांमध्ये ४५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी केमिस्ट, व्यवस्थापकीय संचालक, तांत्रिक संचालक आणि व्यवस्थापन सल्लागार अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी १९८१ ते २००० या काळात पूर्णा आणि मांजरा सहकारी साखर कारखान्यात विविध पदांवर काम केले. त्यानंतर २०१५ पर्यंत त्यांनी विलास साखर सहकारी कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. एसटीएआय, डीएसटीए आदी अनेक तांत्रिक संघटनांचे ते आजीवन सदस्य आहेत.