लातूर : साखर कारखाना हे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे केंद्र आहे. साखर कारखान्याचा १४ वा गळीत हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे पूर्ण झाला आहे, असे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नमूद केले. उजना येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या ऊस गळीत हंगामाच्या सांगता समारोहात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते. दरम्यान, यावर्षी आपल्या कारखान्याचे ५ लाख १२ हजार टन गाळप झाल्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनी जाधव यांनी सांगितले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्यामुळे हा कारखाना उभा राहिला त्यांची आठवण या ठिकाणी आपल्या सर्वांनाच भासत आहे. सर्वांच्या सहकार्याने क्षमतेसुद्धा अधिक गाळप कारखान्याने केले. आगामी काळात सुद्धा अशाच पद्धतीचे सहकार्य आपण कारखान्याला करावे. यावेळी अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सूरज पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष पी. जी. होनराव, शिवानंद हैंगणे, शिवाजीराव देशमुख, गोविंद पाटील, बापूराव सारोळे, सुंदर साखरे, हेमंत जाधव, नितीन पाटील, संजय कोटलवार, राजू भाई आंदोरीकर, सादिक शेख, पांडुरंग धडे, शिवाजी मरलापल्ले आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकरी, कंत्राटदार यांचा सन्मान करण्यात आला.


















