लातूर : येथील श्री नीलकंठेश्वर साखर कारखान्यात उत्पादित झालेली साखर प्रथमच किल्लारी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत या बाजारपेठेत इतर साखर कारखान्यांची साखर विकली जात होती. मात्र बुधवारपासून किल्लारीतील कारखान्यात तयार झालेली साखर बाजारात दाखल झाल्याने व्यापाऱ्यांनी हा क्षण आनंद व्यक्त केला. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, व्यापारी सिद्राम जिडगे, शहाजी पाटील, नितीन सगर, मधुकर सगर, ब्रिजगोपाल बजाज यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद भोसले यांनी चौदा वर्षांनंतर आपल्या कारखान्यातून उत्पादित झालेल्या साखरेची गोडी पुढेही कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानिमित्ताने साखरेच्या पहिल्या गाडीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. किल्लारी साखर कारखान्याची साखर बाजारात आल्यामुळे येथील बाजारपेठेला मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित साखर उपलब्ध झाल्याने वाहतूक खर्चात बचत होत असून व्यापाऱ्यांना वेळेत माल मिळू लागला आहे. याचा थेट फायदा ग्राहकांनाही होत असून त्यांना दर्जेदार व ताजी साखर उपलब्ध होत आहे. स्थानिक कारखान्यात उत्पादित साखर थेट किल्लारी बाजारपेठेत येणे हा येथील व्यापाऱ्यांसाठी अभिमानाचा व समाधानाचा क्षण ठरला आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यापारी वर्गाने व्यक्त केल्या.
















