लातूर : ट्वेंटीवन शुगर्स कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावांमध्ये चाबूक काणी, गवताळ वाढ रोग यांचा प्रादुर्भाव होऊन ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊस पिकामधील कीड व रोग यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोहोचवण्याच्या अनुषंगाने ट्वेंटीवन शुगर्स युनिट २ चे अध्यक्ष, आमदार अमित देशमुख, उपाध्यक्ष विजय देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष पाटील, मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथील शास्त्रज्ञांच्या माध्यमातून तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत ‘व्हीएसआय’चे ऊस पैदासकार डॉ जुगल रेपाळे, मृद शास्त्रज्ञ ज्योती खराडे, गडदे, येळकर यांनी आचार्य टाकळी, कासारवाडी, पोहणेर, हिवरा, पिंपरी बु., कानेगाव, शिर्शी, नरवाडी, खडका, वाणी संगम, दुधगाव, लासीना, मंगरूळ, रामेटाकळी, केकर जवळा, रामपुरी, कौडगाव साबळा आदी गावातील ऊस प्लॉटला भेटी देऊन शेतकऱ्यांना सिओ ६२१७५ या शिफारस नसलेल्या ऊस जातीची लागवड केल्यामुळे चाबूक काणी, गवताळ वाढ या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
चाबूक काणी रोगाचे बिजाणू वर्षानुवर्ष शेतामध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहतात तसेच हवेच्या माध्यमातून बाधित ऊसाच्या क्षेत्रातून चांगल्या ऊस क्षेत्रामध्ये पसरून इतर ऊस जातीमध्ये सुद्धा या रोगाचा प्रसार होऊन संपूर्ण ऊस क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे रोगग्रस्त उसाचे अवशेष शेतामधून काढून नष्ट करणे आणि रोगांना बळी पडणाऱ्या सिओ ६२१७५ या ऊस जातीची लागवड टाळण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांन कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, ‘व्हीएसआय’ यांनी शिफारस केलेल्या ऊस जातीची लागवड करणे, त्रिस्तरीय बेणे मळा, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान अवलंब करणे बाबत डॉ रेपाळे यांनी मार्गदर्शन केले.
मृद शास्त्रज्ञ खराडे यांनी ऊस पिकामध्ये संतुलित खत व्यवस्थापन, जिवाणू खतांचा सेंद्रिय खतांचा वापर व माती परीक्षण बाबत मार्गदर्शन केले. त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावांचा जमीन सुपीकता निर्देशांक अनुषंगाने मातीचे नमुने संकलित केले. शिरोरी येथील ऊस रोप नर्सरीचालक यादव यांच्या नर्सरीला भेट देऊन शास्त्रोक्त पद्धतीने ऊस रोप तयार करण्याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सिडिओ येळकर यांनी ऊस पिकामध्ये सद्यस्थितीत निदर्शनास येत असलेल्या पाकोळी, पांढरी माशी, मावा किडींचा तसेच चाबूक काणी, तांबेरा, गवताळ वाढ रोगाचा प्रादुर्भाव निरीक्षणे दाखवून व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुचवल्या.
सिएओ गडदे यांनी पूर्व हंगामी ऊस लागवड २०२५-२६ करिता करावयाचे नियोजन बाबत मार्गदर्शन केले. सदर शिवार फेरी उपक्रमामध्ये कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी रतन कदम, कृषी पर्यवेक्षक भगवान सोळंके, विठ्ठल लाटे, राम कुलकर्णी, लक्ष्मीकांत रेवडकर, वैजनाथ हांडे, कृषी सहाय्यक शरद शिंदे, माणिक सोळंके, अमोल हिके, अजित यादव, गोपाळ महात्मे, गोपाळ जाधव, सर्वोत्तम दिवाण, सतिश यादव, ज्ञानेश्वर हट्टे तसेच संबंधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.