लातूर : औसा तालुक्यात अवघ्या महिन्याभरात किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर कारखान्याने ५५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले, तर बेलकुंडच्या मारुती महाराज कारखान्याने ६५ हजार मेट्रिक टनांपर्यंत उसाचे गाळप करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या बेलकुंडचा मारुती महाराज कारखाना प्रतिदिन २१०० ते २२५० मेट्रिक टन, तर किल्लारीचा श्री निळकंठेश्वर कारखाना प्रतिदिन २७०० ते ३००० मेट्रिक टन उसाचे गाळप करीत आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारीचा निळकंठेश्वर कारखाना सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यावर्षी मारुती महाराज कारखान्याने उसाला प्रतिटन ३,०११ रुपये दर जाहीर केला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंतच्या उसापोटी २७५० रुपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याला नवसंजीवनी देण्यात आली. गाळप क्षमता दुप्पट करण्यात आल्याने हा कारखाना मांजरा परिवारातील कारखान्यांच्या बरोबरीने गाळप करीत आहे. यंदा कारखाना चार लाख मेट्रिक टनांपर्यंत उसाचे गाळप करेल, असा अंदाज आहे. मारुती महाराज कारखाना यावर्षी तीन लाखांहून अधिक मेट्रिक टन उसाचे गाळप करेल, असा अंदाज आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि भंगार अवस्थेत गेलेल्या या कारखान्याला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नवबळ दिले. हार्वेस्टरद्वारे कारखान्याच्या मालकीची तोडणी यंत्रणा उभारून ऊसतोड कामगारांच्या कमतरतेवर तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मारुती महाराज कारखाना विना अडथळा दिमाखात गाळप करीत आहे. ऊस उत्पादकांची होणारी फरफट थांबवून ऊस शेतीपासून दूर गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उसाकडे वळवण्यासाठी या दोन्ही कारखान्यांच्या पुनरुज्जीवनात आमदार अभिमन्यू पवार आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने आठ ते नऊ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
















