लातूर : तोंडार (ता. उदगीर) येथील मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखान्याला २०२४-२५ या वर्षासाठीचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडून दिला जाणारा “कै. राजे विक्रमसिंह घाटगे सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार” जाहीर झाला आहे. तांत्रिक उत्कृष्टतेच्या जोरावर विलास कारखान्याने सहकार आणि साखर उदयोगात आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. पुरस्कार सोमवारी (ता. २९) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रदान करण्यात येणार आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात कारखाना दमदार वाटचाल करीत आहे.
साखर कारखानदारीतील तांत्रिक कार्यक्षमतेचे मूल्यमापन करून हा पुरस्कार दिला जातो. विलास कारखान्याने गेल्या हंगामात केलेली कामगिरी सरस ठरली आहे. शून्य टक्के ब्रेकडाऊन, तांत्रिक (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) कारणास्तव कारखाना बंद राहण्याचे प्रमाण शून्य टक्के राहिले आहे. कारखान्याने १२ टक्के इतका दर्जेदार साखर उतारा मिळवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गाळप क्षमतेच्या वापरामध्ये १०.७४ टक्के वाढ झाली आहे. साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर केवळ ३७.२६ टक्के (प्रतिऊस) इतका मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘मांजरा’च्या गाळप क्षमतेत वाढ…
मांजरा कारखान्याने गाळप क्षमतेत वाढ केली आहे. त्यासाठी नवीन ३० टन वजनाच्या बॉयलरची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस गाळप लवकर होण्यास मोठी मदत होणार आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३० टनी नवीन बॉयलरचा अग्नी प्रदीपन समारंभ गुरुवारी (ता. २५) झाला. कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते तो करण्यात आला. यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, कारखान्याचे संचालक शंकर बोळंगे, संचालक श्रीकृष्ण काळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

















