लातूर : निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी ११ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. कारखान्याने ५ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे गाळप करून वीज व इथेनॉलचीही निर्मिती केली आहे. उसाचे गाळप चांगल्या पद्धतीने होत असल्याने कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी त्रिपक्षीय समितीच्या शिफारशीनुसार कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख यांनी यावेळी केली.
यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा देशमुख यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घ्याव्यात. कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. खासदार डॉ. शिवाजी काळगे, कारखान्याच्या अध्यक्ष वैशाली देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, रेणा कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक मुकुंदराव काळे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. राहुल इंगळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक तात्यासाहेब पालकर यांनी आभार मानले.


















