अहिल्यानगर : जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, पाथर्डी, पारनेर, नेवासे, राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने हल्ले केले आहेत. आता, मानवावरही हल्ले झाले आहेत. त्यामुळे उत्तर जिल्ह्यातील अनेक गावात सायंकाळी सातनंतर घराबाहेर कोणी पडत नाही. त्यातच आता ऊसतोडणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २२ कारखान्यांना गळितासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या ऊस तोडणीसाठी मजुरांनी ठिकठिकाणी वस्ती केली आहे. मजुरांकडून ऊस तोडला जात असल्याने बिबट्यांचे लपण्याचे ठिकाण कमी होऊ लागल्याने ते सैरभैर झाल्याने लोकवस्तीकडे येत असून, यातूनच ते हल्ले करत आहेत. त्यामुळे ऊस तोडणीला मोठा फटका बसत आहे.
ऊस तोडणीच्या हंगामात बिबट्यांच्या हालचालींनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटे ऊस तोडणी कामगारांवर, तसेच ग्रामस्थांवर हल्ले करत असल्याने ऊस तोडीची गती मंदावली आहे. ऊसतोडणी कामगारांनी आपली व कुटुंबाची सुरक्षितता पाहून मुक्कामाचे ठिकाण बदलले आहे. मुक्कामाच्या ठिकाणी राहणाऱ्या टोळ्यांनी यंदा राहण्याचा मुक्काम हलवला असून, अनेकजण आता गावाजवळ राहण्यास पसंती देत आहेत. कोपरगाव, संगमनेर, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता तालुक्यांतील ऊसतोड मजुरांच्या खोप्यांवर आता रात्री व दिवसा राखण केली जात आहे. बिबट्याच्या धास्तीने ऊसतोडणी मजूर सकाळी सातच्या सुमारास ऊसतोडणीस निघत आहे. अकरा ते साडेअकरापर्यंत तोडणी करत आहेत. त्यानंतर पुन्हा सायंकाळी चारच्या सुमारास जाऊन पाचच्या सुमारास परत घराकडे परतत आहे. परिणामी त्याचा ऊसतोडणीवर परिणाम झाला आहे.












