सातारा : मानव-बिबट्या संघर्ष वाढू लागला आहे. बिबटे आता मानवी वस्ती लगतच्या घनदाट पिकांच्या शेतांमध्ये मुक्कामी राहू लागले आहेत. तसेच ऊसतोड सुरु असताना कराड, पाटण, सातारा तालुक्यांमध्ये बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. या पार्श्वभूमीवर वनविभाग ॲन मोडवर आला असून आता ऊस, केळीच्या बागा, हत्तीघास या पिकांच्या शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बिबट्यांच्या संख्येचा अंदाज घेतला जाणार आहे.
राज्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढल्यामुळे आता जंगलाबाहेरही बिबट्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ऊस, केळीच्या बागा आणि कापसाची शेती, हतीघासाच्या शेतांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी राज्य आणि केंद्र शासनाच्या वन्यजीव संवर्धन धोरणासाठी देण्यात येणार आहे.
राज्यात बिबट्यांची संख्या ऊस, हत्तीघास, केळीच्या बागांमधील बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शेतात कामाला गेलेल्या शेतकऱ्यांवरही बिबटे हल्ले करत आहेत. त्यावर योग्य नियंत्रण आणण्यासाठी विक्ट्यांची अचूक माहिती अथवा संख्या उपलब्ध व्हावी, यावर वनविभागाने भर दिला आहे. विशेषतः दर चार वर्षांनी बिबट्यांची जनगणना केली जाते.
सध्या २०२२ मधील जनगणनेनुसार राज्यात तब्बल २,२८५ बिबटे आढळले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत बिबटे जंगलातून बाहेर येऊन ऊस, कापूस, केळी, द्राक्षाच्या बागा, हत्तीघास पिकांमध्ये वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वनविभाग वन्यजीव संवर्धन धोरणासाठीही जंगलाबाहेरील हालचालीवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
केवळ जंगलातीलच नव्हे तर शेतशिवारातील बिबट्यांचेही सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी ऊस, केळीच्या बागा आणि हत्तीघास आदी भागांमध्येही कॅमेरे बसवले जाणार आहेत. या सर्वेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीमुळे बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्याबरोबरच माणूस-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी मदत होणार आहे, असे सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.
जणनगणनेची तयारी सुरु…
राज्य शासनाच्यावतीने पुढील वर्षी वन्यजीवांची गणना केली जाणार आहे. सातारा वन विभागानेही या गणनेची तयारी सुरु केली आहे. या परिस्थितीत शेतांमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फायदा होणार आहे. वनवविभागाने हे काम हाती घेतले आहे.
अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा वापर…
जंगलाबाहेर किंवा मानवी वस्तीत कॅमेरे बसवणे थोडे जोखमीचे असले तरी विषट्यांची अचूक संख्या मिळवण्यासाठी हा पर्याय आवश्यक आहे. तसेच चोरी टाळण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे बसवणे जरुरीचे आहे.

















