सोलापूर : ऊस तोडणी मशीन खरेदी करण्यासाठी लोकनेते कारखान्याकडे १४ सुशिक्षित बेरोजगार युवकांनी प्रत्येकी ३० लाख रुपयांची मागणी केली होती. त्याप्रमाणे १४ ऊस तोडणी मशीन खरेदीसाठी कारखान्याकडून ४ कोटी ३० लाख रुपये बिगरव्याजी देण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामात ४० टक्के ऊस यंत्राद्वारे तोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी दिली.
ऊस तोडणी मजुरांबरोबरच मुकदमाकडून कारखान्याची दरवर्षी होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणुक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची टोळ्यांकडून होणारी पिळवणुक निदर्शनास येत आहे. म्हणून येणाऱ्या गळीत हंगामात कारखान्याला येणारा ४० टक्के ऊस हा यंत्राद्वारे तोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग यावर्षी यशस्वी झाल्यास पुढील गळीत हंगामात ५० टक्क्यांपेक्षा जास्त ऊस हा यंत्राद्वारे तोडण्यात येणार आहे, अशी माहिती चेअरमन पाटील यांनी दिली.
२०२५-२६ चालू ऊस गळीत हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातील ४० टक्के ऊस यंत्राने तोडण्यात येणार आहे. यासाठी मागील हंगामातील उसतोडणी यंत्र १० तर १४ नवीन असे एकूण २४ ऊस यंत्राद्वारे ऊस तोडणार आहे. मांजरा कारखाना १०० टक्के ऊस यंत्राद्वारे तोडून आणत आहे.