नवी दिल्ली : वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढविण्याचा मार्ग पत्करला आहे. आरबीआयने मे महिन्यात ०.४० टक्के रेपो दरवाढ केली होती. आता जून महिन्यातील पतधोरण समितीच्या बैठकीत केंद्रीय बँकेने आणखी ०.५० टक्के दरवाढ केली. त्यामुळे मे आणि जून महिन्यात एकूण ०.९० टक्के दरवाढ झाली आहे. आता रेपो रेट ४.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयने बुधवारी जाहीर केलेल्या निर्णयानंतर गेल्या २४ तासात सात बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आयसीआयसीआयने गुरुवारी बेंचमार्क लेडिंग रेट ०.५० टक्के वाढवून ८.६० टक्के केला आहे. आयसीआयसीआयच्या वेबसाईटवरील नोटिफिकेशनमध्ये याची माहिती दिली आहे. बँकेचा एमसीएलआर तीन महिन्यांसाठी अनुक्रमे ७.३० टक्के आणि ७.३५ टक्के असेल. तर सहा महिन्यांसाठी हा दर ७.५० टक्के आणि वर्षभरासाठी ७.५५ टक्के राहील. बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी लिमिटेड, इंडियन ओव्हरसिज बँक आणि एचडीएफबी बँक यांनीही दरवाढ केली आहे. एचडीएफसी लिमिटेडने बेंचमार्क रिटेल प्राइम लेंडिंग रेट वाढवला आहे. एआरएचएल आता ०.५० टक्के वाढविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.












