कोल्हापूर : राज्यात 3 मार्च 2026 अखेर 1005.1 लाख मेट्रिक टन गाळप आणि 950.31 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 113 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. गाळप हंगाम संपत आला असला तरी 28 फेब्रुवारीअखेर राज्यातील तब्बल 168 साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 4,898 कोटींची एफआरपी थकविल्याचे साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, गाळप करीत असलेल्या 206 साखर कारखान्यांपैकी तब्बल 168 कारखान्यांनी 28 फेब्रुवारीअखेर पूर्ण एफआरपी दिलेली नाही. केवळ 38 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी दिली आहे. राज्यात 15 फेब्रुवारीपर्यंत 972.59 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले आहे. या उसासाठी वाहतूक व हाताळणीसह एकूण देय एफआरपी (तोडणी वाहतूक खर्चासह) 37,662 कोटी रुपये आहे. यापैकी 33,006 कोटी रुपये (तोडणी वाहतूक खर्चासह) एफआरपी अदा करण्यात आली आहे.
राज्यात 38 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी अदा केली.79 कारखान्यांनी 80 ते 99.99 टक्के एफआरपी दिली. 57 कारखान्यांनी 60 ते 79.99 टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. 32 कारखान्यांनी 60 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. या कालवधीअखेर कारखान्यांकडून 4,898 कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले वेळेत देण्यात यावीत, यासाठी साखर कारखानदार साखरेची एमएसपी प्रती किलो ४१ रुपये करावी, इथेनॉलचे दर वाढवावेत आणि इथेनॉलचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी करत आहेत.


















