महाराष्ट्र : राज्यात १४ नोव्हेंबरअखेर १८५ साखर कारखान्यांना मिळाली ऊस गाळपाची ऑनलाइन परवानगी

पुणे : राज्यात यंदा २०२५-२६ या हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील सहकारी व खासगी अशा एकूण २१४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज भरले होते. प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून आयुक्तालय स्तरावर प्राप्त अर्जांची छाननी झाली. त्यातून परिपूर्ण असलेल्या ९१ सहकारी व खासगी ९४ अशा एकूण १८५ साखर कारखान्याना दि. १४ नोव्हेंबरअखेर गाळप परवाने वितरित करण्यात आल्याचे आयुक्तालयातून सांगण्यात आले. मात्र, ऊसगाळप किती झाले, ही माहिती प्रत्यक्षात उपलब्ध होऊ शकली नाही. महाशुगर पोर्टलवर ऊस गाळपाची माहिती देण्यास साखर कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे.

ऊस गाळप हंगाम सुरू होऊन पंधरवडा उलटला आहे. तरीही गाळप किती झाले याची माहिती साखर आयुक्तालयस्तरावर उपलब्ध झालेली नाही. साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या गाळप परवान्यातील अटींमध्येही दैनंदिन ऊस गाळप अहवाल आयुक्तालयास कळविण्याचे बंधन आहे. मात्र, कारखानदार ‘महाशुगर’ पोर्टलवर माहिती भरण्याचे कारखाने विसरून गेले आहेत. ऊस गाळप व साखर उपलब्धतेची स्थिती केंद्र सरकारला दररोज कळविणे हे ऊस गाळप अहवालामुळे शक्य होते. त्यासाठी साखर आयुक्तालयाने कारखान्यांसाठी crushinglic.mahasugar.co.in हे पोर्टल विकसित केले आहे. यापूर्वी त्याचा यशस्वीपणे वापरही झाला. तत्कालीन साखर आयुक्त संभाजी कडू पाटील व तत्कालीन साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. सध्या मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here