पुणे : राज्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून साखर कारखान्यांनी गाळप आटोपते घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील साखर गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून, आतापर्यंतच्या कालावधीत सहकारी साखर कारखान्यांची चांगली कामगिरी दिसून आली आहे. साखर आयुक्तालयाद्वारे दिलेल्या आकडेवारीनुसार, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील २० कारखाने बंद झाले आहेत. गेल्या १०८ दिवसांमध्ये राज्यातील २१० कारखान्यांनी ९६० लाख ७९ हजार ४७ टन उसाचे गाळप केले असून, सरासरी ९.२ टक्के उताऱ्यानुसार एकूण ८९८ लाख ४९ हजार ८९४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आगामी काही दिवसांत कारखाने बंद होण्याचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सहकारी कारखान्यांनी ४,८०,३५,००५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून खासगी कारखान्यांनी ४,१८,१४,८८९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. एकूण ८,९८,४९,८९४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर ४,८७,४५,७८७ टन ऊस गाळप सहकारी कारखान्यांनी केले आहे. खासगी कारखान्यांनी ४,७३,३३,८५९ टन ऊस गाळप केले आहे. एकूण ९,६०,७९,०४७ टन ऊस गाळप झाले आहे. काही भागांत उसाला तुरे आल्याने उसाच्या वजनात घट झाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत सर्वाधिक ६ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात बंद झाले आहेत. तर सातारा जिल्ह्यातील ५ कारखान्यांचा हंगाम बंद झाला आहे. कोल्हापूरमध्ये तीन तर सांगली, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांत प्रत्येकी दोन कारखाने बंद झाले आहेत.


















