महाराष्ट्र : सहकारी साखर कारखान्यांमध्ये होणार ५० कार्यकारी संचालकांची नियुक्ती

अहिल्यानगर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर नवीन ५० कार्यकारी संचालक नियुक्तीच्या प्रक्रियेला साखर आयुक्त कार्यालयाने कार्यवाही सुरू केली आहे. या नियुक्त्या साखर कारखान्यांना बंधनकारक असतील. साखर आयुक्तांनी दिलेले आदेश हे सहकारी साखर कारखान्यांना बंधनकारक आहेत. शासनाच्या २८ मार्च २०२५ च्या पत्रान्वये ५० पात्र कार्यकारी संचालकांचे पॅनल प्रसिद्ध करण्यास साखर आयुक्त कार्यालयाने मान्यता दिली आहे. कार्यकारी संचालकांच्या नियुक्त्या करण्यासाठी साखर कारखान्यांना निर्देश देण्यात आल्याची माहिती साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

शासन निर्णयानुसार नव्याने नियुक्त केल्या जाणाऱ्या कार्यकारी संचालकांना कोणतीही मुदत असणार नाही. हे कार्यकारी संचालक सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत पॅनेलमध्ये समाविष्ट असतील, तसेच साखर आयुक्त कार्यालयाने सूचविलेल्या कार्यकारी संचालकांच्याच नियुक्ती करणे कारखान्यावर बंधनकारक असेल, असा इशारा या कार्यालयाने दिला आहे. या कार्यकारी संचालकांच्या नियुक्ती करताना परीविक्षाधिन कार्यकारी संचालक या पदावर कराव्यात. हा कालावधी एक वर्षाचा असेल. कार्यकारी संचालकांनी कर्तव्यात कसूर केली किंवा गैरवर्तन केल्यास कार्यकारी संचालक पदावरून कमी करण्याचा अधिकार कारखान्याच्या संचालक मंडळास देण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here