महाराष्ट्र : ऊस पिकातील ‘एआय’ तंत्रज्ञानाचा उत्तर प्रदेश, आंध्रसह कर्नाटकमध्येही होतोय विस्तार

पुणे : बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ऊस शेतीचा प्रकल्प आता उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये विस्तारला जात आहे. ‘एडीटी’ संस्थेचे विश्वस्त प्रताप पवार यांच्या पुढाकाराने देशभर एआय तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश मिळत आहे. प्रकल्पाच्या पहिल्या वर्षात ऊस शेतीतील पाणी वापर ३० टक्क्यांनी, तर खत-कीडनाशक वापर २५ टक्क्यांनी कमी करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून साखर उताराही जास्त मिळत आहे. महाराष्ट्रात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि सुमारे ४८ प्रमुख साखर कारखान्यांच्या सहकार्याने एआय ऊस शेतीचा प्रकल्प राबवला जात आहे. या माध्यमातून आजवर ५,२७८ शेतकरी आणि सुमारे १४,२०० एकर क्षेत्र या तंत्रज्ञानाच्या कक्षेत आले आहे.

महाराष्ट्रात मिळालेले यश पाहून हा उपक्रम आता इतर राज्यांमध्ये राबवला जात आहे. महाराष्ट्राबाहेरील विविध साखर कारखान्यांमध्ये एआय आधारित शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या या उपक्रमाला इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) सहकार्य मिळाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मवाना व नागलमल साखर कारखान्यांनी उसाच्या ‘को- ११८’ या वाणासाठी २१ प्रगतिशील शेतकऱ्यांबरोबर काम सुरू केले आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये ‘एसएनजे शुगर’ कारखाना ‘को- ८६०३२’ या वाणाच्या उसासाठी प्रकल्प राबवत आहे. कर्नाटकातील ‘निराणी शुगर’ सोबत चर्चा पूर्ण होऊन लवकरच काम सुरू होणार आहे. उपग्रहाधारित रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान संपूर्ण शेताचा नकाशा देऊन एनडीव्हीआय, ईव्हीआय, पाणी नकाशा आणि पीक ताण यासारखी माहिती देते. या क्षेत्रातही काही स्टार्टअप काम करीत आहेत. खुल्या शेतातील पिकांसाठी रिमोट सेन्सिंग, आयओटी सेन्सर, ड्रोन तंत्रज्ञान, प्रत्यक्ष शेतातील निरीक्षण, प्रयोगशाळेतील निष्कर्ष आणि या सर्व विदेचा (डेटा) वापर करणारे विशिष्ट एआय अल्गोरिदम यांचा एकत्रित वापर केल्यावर अपेक्षित उत्पादनवाढ आणि संसाधनांची बचत प्रभावीपणे साध्य होते असे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here