पुणे : सध्या राज्यात ऊस पिकाखालील सरासरी क्षेत्र १० ते ११ लाख हेक्टरच्या आसपास राहते. तर मका पिकाचे सरासरी क्षेत्र ९.३३ लाख हेक्टर इतके आहे. अलीकडील काही वर्षात मका लागवड क्षेत्र सतत वाढत आहे. यंदा तर मक्याची तब्बल १३.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर उच्चांकी पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी विभागाच्या ताज्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने नुकतेच धान्यापासून इथेनॉल निर्मितीच्या धोरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे पशुखाद्य आणि पोल्ट्री उत्पादकांच्या मागणीसह आता इथेनॉल बनविण्यासाठी मका पिकाला मोठी संधी निर्माण झाली आहे.
दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, इथेनॉल उत्पादनास दिलेल्या प्रोत्साहनामुळे मका लागवडीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन, कापूस, ऊस पिकाखालील पेरणी, लागवड कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे दिते. खरिपातील प्रमुख पिकांपैकी सोयाबीन पिकाखाली ४८ लाख हेक्टर तर कापूस पिकाखाली ३८ लाख हेक्टरइतके मोठे क्षेत्र आहे. ऊस पिकाखाली शेत १२ ते १४ महिने अडकून पडते. त्याऐवजी साडेतीन ते चार महिन्यात मका पीक घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मका लागवडीला प्रोत्साहन मिळेल अशी शक्यता आहे.
याबाबत ‘विस्मा’चे व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले म्हणाले की, केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने धान्यांपासून इथेनॉल तयार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस गाळप संपल्यानंतर उर्वरित शिल्लक दिवसांमध्ये इथेनॉलचे उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पांची उभारणी होण्यास म्हणजे ऊसाप्रमाणेच धान्यांपासून इथेनॉल तयार करण्यासाठी मल्टी फिड डिस्टलरीजची उभारणी होण्यास सुमारे एक वर्षाचा अवधी जाईल.