महाराष्ट्र : राज्यात हार्वेस्टरच्या वापराने तब्बल २५ टक्के ऊस तोडणी

पुणे : राज्यात १९ नोव्हेंबरअखेर १४७ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. यात ७७ सहकारी, तर ७० खासगी कारखाने आहेत. या कालावधीत ११७ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ८.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात यंदा हार्वेस्टरचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या सुरू असलेल्या ऊस तोडणीच्या सुमारे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत हा वापर वाढला आहे. पहिल्या टप्प्यात कारखान्यांकडून हार्वेस्टरने ऊस तोडणीला प्राधान्य देण्यात आले आहे. साखर कारखानदार कार्यक्षेत्र नसलेल्या भागात हार्वेस्टर पाठवून तोडणीला पसंती देत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्र मोठे असणाऱ्या एकेका गावात तब्बल दहा ते बारा हार्वेस्टर रात्रंदिवस ऊस तोडणी करत असल्याचे चित्र आहे. यामुळे दिवसाला त्या गावातील तब्बल चाळीस ते पन्नास एकर उसाची तोड होत आहे.

राज्यात गेल्या पंधरवड्यापासून गळीत हंगाम वेगाने सुरू झाला आहे. बहुतांश कारखान्यांनी गाळप वाढविले असल्याने पहिल्या टप्प्यात जादा उसाची गरज आहे. सद्यस्थितीत ज्या भागात मे महिन्यापासून सलग पाऊस झाला आहे, त्या भागात उसाची वाढ खुंटल्याचे चित्र आहे. ही घट एकरी पाच ते दहा टनांपर्यंत आहे. तर कारखान्यांनी लांब अंतरावरील व कार्यक्षेत्राबाहेरील उसासाठी हार्वेस्टरचा वापर सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात मजुरांकडून स्थानिक भागातील ऊस तोडणीस प्राधान्य दिले आहे. राज्यात चांगला ऊस दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस चांगला मिळत असल्याचे पहिल्या टप्प्यातील चित्र आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक दोन लाख टन साखर तयार झाली आहे. या विभागाचा उतारा ही सर्वाधिक ८.५५ टक्के आहे. सोलापूर विभागात सर्वाधिक ३२, तर कोल्हापुरात ३० कारखाने सुरू झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here