महाराष्ट्र : राज्यात 21 डिसेंबरअखेर 191 कारखान्यांकडून 446.04 लाख टन उसाचे गाळप

पुणे : साखर आयुक्तालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 डिसेंबर 2025 अखेर 446.04 लाख टन उसाचे गाळप आणि 380.21 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 8.52टक्के आहे. राज्यात 95 सहकारी आणि 96 खाजगी अशा एकूण 191 कारखान्यांनी हंगाम सुरु केला आहे. मागील हंगामात याच कालावधीत 97 सहकारी आणि 97 खाजगी अशा एकूण 194 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला होता. मागील वर्षी याच काळात 268.67 लाख टन उसाचे गाळप होऊन 222.82 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. सरासरी साखर उतारा 8.29 टक्के इतका होता.

कोल्हापूर विभागाची 10 टक्के उताऱ्यासह राज्यात आघाडी…

कोल्हापूर विभागाने 98.79 लाख टन उसाचे गाळप करून 98.77 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 10 टक्के इतका आहे. विभागात 25 सहकारी आणि 12 खासगी असे 37 कारखाने सुरु आहेत. पुणे विभागात 17 सहकारी आणि 13 खाजगी असे एकूण 30 कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतापर्यंत 109.34 लाख टन उसाचे गाळप करून 96.02 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा 8.78 टक्के आहे.

सोलापूर विभागात 43 कारखान्यांकडून 72.6 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन…

सोलापूर विभाग ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 15 सहकारी आणि 28 खाजगी असे एकूण 43 कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत विभागात 94.63 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 72.6 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा 7.67 टक्के इतका आहे. अहमदनगर (अहिल्यानगर) विभाग ऊस गाळपात चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात 15 सहकारी आणि 11 खाजगी असे एकूण 26 कारखाने सुरु झाले आहेत.या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 53.23 लाख टन उसाचे गाळप करून 42.38 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अहमदनगर विभागाचा साखर उतारा 7.96 टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 12 सहकारी आणि 9 खाजगी अशा एकूण 21 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यांनी 41.44 लाख टन उसाचे गाळप करून 29.96 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर उतारा 7.23 टक्के इतका आहे.

नांदेड विभागात 43.89 लाख टन उसाचे गाळप…

नांदेड विभागात 10 सहकारी आणि 19 खाजगी असे एकूण 29 कारखाने सुरु असून त्यांनी 43.89 लाख टन उसाचे गाळप करून 36.49 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 8.31 टक्के इतका आहे. अमरावती विभागात 1 सहकारी 3 खाजगी कारखाने सुरु असून 4.69 लाख टन उसाचे गाळप करून 3.98 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 8.49 टक्के आहे. नागपूर विभागात एक खाजगी कारखाना सुरु झाला असून 0.03 लाख टन गाळप झाले असून 0.01 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा सर्वाधिक कमी 3.33 टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here