महाराष्ट्र : केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना ‘ज्युट’ पोती वापरण्याबाबत पाठवले स्मरणपत्र

कोल्हापूर : साखर उद्योगाच्या स्थापनेपासून साखर पॅकिंगसाठी ज्युटच्या शंभर किलोच्या पोत्यांचा वापर केला जात होता. मात्र, साखर खराब होऊन किमतीवर होणारा प्रतिकूल परिणाम तसेच ज्यूटच्या पोत्यांचे दुप्पट असणारे दर यामुळे साखर टिकून राहणाऱ्या अत्याधुनिक पीपी बॅगचा वापर साखर उद्योगात वाढला आहे. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात दरवर्षी साखर कारखान्यांना ज्युटच्या बॅगांचा वापर करण्याबाबत स्मरणपत्रे पाठवून उत्पादित साखरेपैकी किमान वीस टक्के साखरेचे पॅकिंग हे ज्युट बॅगांमध्ये करावे, असे आदेश दिले आहेत. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे संयुक्त सचिव हरीश कुमार शाक्य यांनी कारखान्यांना स्मरणपत्रे पाठवली आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील ज्युट उद्योगाच्या हितासाठी केंद्र सरकार साखर उद्योगाला वेठीला धरत असल्याचा नाराजीचा सूर साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. साखर पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या एका पीपी बॅगची किंमत २२ ते २५ रुपयांदरम्यान असून, ज्युट बॅगची किंमत ७० ते ८० रुपयांच्या दरम्यान आहे. साखर कारखान्यांना एका बॅगेमागे किमान पन्नास रुपये जादा मोजावे लागणार आहेत. आगामी हंगामात राज्यात १०० टन साखरेचे उत्पादन गृहीत धरले, तर साखर कारखान्यांना किमान दीडशे कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. केंद्राच्या धोरणानुसार अनेक कारखान्याने त्यांना परवडेल अशा दरात ज्युटच्या बॅगांसाठी टेंडर काढली होती; मात्र त्यांना व्यापाऱ्यांकडून त्याच दरात प्रतिसाद मिळत नाही. बऱ्याचदा उपलब्ध होणाऱ्या बॅगांची संख्या नाममात्र असते व त्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कारखान्यांची कोंडी होते. सरकारने याबाबत फेरविचार करणे गरजेचे आहे असे मत साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here