कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये बसविण्यात येणाऱ्या वजन काट्यांच्या तपासणीसाठी असलेल्या नियमावलीत सुधारणांसह नवीन तंत्रज्ञान राबवण्यासाठी ‘वैधमापन शास्त्र’ विभागातील तज्ज्ञ चौघा अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. दि. १२ मार्चपर्यंत समितीने अहवाल सादर करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. संभाजीनगर वैधमापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक सु. ह. चाटे हे समितीचे अध्यक्ष असतील तर सांगलीचे उपनियंत्रक डी. पी. पवार हे समितीचे सदस्य सचिव असतील. याशिवाय, वाघोली विभागाचे निरीक्षक डी. के. शेजवल आणि बारामती विभागाचे निरीक्षक आर. पी. टाळकुटे यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश आहे.
साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी असतात. वजनामध्ये फसवणूक होत असल्याने त्यामध्ये पारदर्शकता यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सुरू होती. शेतकरी संघटनांचाही यासाठी रेटा होता. अखेर शासनाने साखर कारखान्यांमध्ये वजनकाटे बसविण्याबाबत प्रक्रिया करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. आता पुढील टप्प्यात सर्व वजन काटे सर्व्हरला ऑनलाइन जोडले जातील. प्रत्येक वजनाची नोंद शासनाकडे उपलब्ध राहील. यामुळे आपोआपच कारखान्यांवर अचूक वजनाबाबत दबाव येऊ शकतो अशी अपेक्षा आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, साखर कारखान्याकडून सर्व मार्गाने शेतकऱ्यांची लूट होते, त्यातील मोठी लूट म्हणजे वजन काट्याच्या माध्यमातून केली जाते. यासाठी राज्य शासनाकडे आम्ही याबाबत तक्रार केली होती, त्यानुसार ही समिती गठित केली आहे. काट्यांना आधुनिक प्रणाली बसवावी. त्याशिवाय शासनाने स्वतःचे वजनकाटे उभे केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे.


















