पुणे : “साखर उद्योगाच्या बळकटीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांमध्ये समृद्धी याच उद्योगाने आणली. त्यामुळेच राज्यातील साखर उद्योगासाठी नवे धोरण लागू करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्यातून या उद्योगाला चांगले दिवस येतील, असा विश्वास सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ने (विस्मा) ‘शुगर ॲन्ड बायोएनर्जी ॲवॉर्ड वितरण सोहळ्यात ते बोलत होते. साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ‘इस्मा’चे उपाध्यक्ष नीरज शिरगावकर, सरचिटणीस पांडुरंग राऊत, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष बी. एस. भड, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (पुणे), जयवंत शुगर्स (सातारा), श्री गुरुदत्त शुगर्स (कोल्हापूर), द्वारकाधीश साखर कारखाना (नाशिक), दालमिया भारत शुगर (कोल्हापूर) व नॅचरल शुगर (धाराशिव) या कारखान्यांना सहकारमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
सहकारमंत्री पाटील म्हणाले की, राज्याच्या कृषी व ग्रामीण व्यवस्थेला बळकट करण्यात साखर उद्योगाचा वाटा मोठा आहे. या उद्योगाने काही पथ्ये पाळण्याची गरज आहे. तकऱ्यांच्या उसाचे पेमेंट व कामगारांचे पगार वेळेत करायला हवेत. तसेच जमिनीचा पोत राखून कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादनाला प्राधान्य द्यावे. नूतन साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी धाडसाने निर्णय घ्यावेत. त्यांच्यात क्षमता आहे. सरकार आणि मी स्वतः साखर उद्योगाच्या पाठिशी आहे. यावेळी विस्माचे अध्यक्ष ठोंबरे यांनी सांगितले की, पाच जणांनी २००५ मध्ये स्थापन केलेली विस्मा ही संस्था आता १३३ खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधित्व करते आहे. साखर उद्योगाच्या उलाढालीत आता ५५ टक्के वाटा खासगी कारखान्यांकडे आला आहे.”