पुणे : राज्यात गाळप हंगाम सुरू होऊन सुमारे २०-२२ दिवस उलटले आहेत. साखर कारखान्यांच्या गाळपाने वेग पकडला आहे. ऊस लवकर तोडून नेण्यासाठी शेतकऱ्यांची घाई सुरू आहे. काही शेतकऱ्यांना विविध कारणांनी अडवणुकीला सामोरे जावे लागते. अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते. या तक्रारी रोखण्यासाठी साखर आयुक्तांनी सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे महाव्यवस्थापक, तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ‘तक्रार निवारण अधिकारी’ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्याने आलेल्या तक्रारींची चौकशी ७ दिवसांमध्ये करावी. चौकशीत तक्रार खरी आढळून आल्यास संबंधित मुकादमाच्या बिलातून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना द्यावी. सर्व शेतकऱ्यांना याची माहिती होण्यासाठी कारखान्यांच्या आणि ग्रामपंचायतींच्या फलकावर संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, आयुक्तालयाकडे शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या तक्रारी येतात. त्यासाठी उपाययोजना म्हणून आम्ही ‘तक्रार निवारण अधिकारी’ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीची सात दिवसांमध्ये चौकशी करणे बंधनकारक असेल. त्यानंतर पुढील कार्यवाहीची अंमलबजावणी होईल. दरम्यान, तुमचा ऊस पडलेला आहे, तोडणी करणे परवडत नाही, रस्ता नाही, उसाचा दर्जा चांगला नाही, अडचणीच्या ठिकाणी शेत आहे, अशी विविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. या बाबत उद्भवणाऱ्या तक्रारींच्या निराकरणासाठी ‘तक्रार निवारण अधिकारी’ नियुक्तीचा हा निर्णय साखर आयुक्तालयाने घेतला आहे.


















