छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने धान्यापासून इथेनॉल निर्मिती केल्यास त्याचा दर प्रतिलिटर ७२ रुपये, उसाच्या रसापासून ६५ रुपये, बी-हेवी मळीपासून केल्यास ६१ रुपये आणि सी-हेवी मळीपासून केल्यास ५५ रुपये असा दर ठरविले आहेत. त्यामुळे धान्य साठवणूक करून साखर कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी अतिरिक्त २० ते २२ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, धान्याच्या आधारे आणि उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती केल्यास दोघांच्या दरातील किमान फरक सात रुपयांचा आहे. ही स्थिती पाहता धान्यापासून इथेनॉल करण्याच्या निर्णयाचा लाभ होण्याऐवजी अडचणच अधिक असल्याचे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे.
दरांतील तफावत दूर व्हावी, असे राष्ट्रीय साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, साखर कारखान्यांमध्ये उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती करण्यासाठी काही तांत्रिक बदल करावे लागतात. धान्यापासून इथेनॉल करण्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या यंत्रणेत बदल करावे लागणार आहेत. ही रक्कम अधिक आहे. साधारणत: एक लाख लिटर मळीच्या साखर कारखान्यामध्ये धान्य आधारित प्रकल्प उभा करायचा झाल्यास धान्य शिजवून, त्याचा घट्ट रस तयार करेपर्यंतची स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागणार आहे. त्यामुळे दरामधील तफावत काही अंशी कमी करावी, अशी मागणी आहे. तर नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, ‘धान्याच्या आधारे इथेनॉलनिर्मिती वाढावी असे केंद्र सरकारचे धोरण असल्याने हा दर अधिक होता. मात्र, प्रकल्प उभा केल्यास पूर्वी १२० ते १५० दिवस सुरू असणारा हा प्रकल्प ३६५ दिवस सुरू राहू शकतो. त्यासाठी काही यंत्रणा बदलावी लागणार आहे. त्यामुळे फार अडचणी वाढतील, अशी शक्यता नाही.