पुणे : कर्नाटककडून ऊस पळवला जात असल्याने यंदाचा ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्रातील बहुराज्यीय साखर कारखाने चालविणाऱ्या कारखानदारांनी केली आहे. यात बहुतांश खासगी व सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर खाजगी साखर कारखानादारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) या संघटनेने १५ ऑक्टोबर पासून कारखाने सुरू करण्याची मागणी केली आहे. गळीत हंगाम सुरू कधी करायचा याविषयी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता दिसून येत आहे. दरम्यान, आज (30 सप्टेबर) मंत्री समितीची बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे यातून काय मार्ग काढणार याकडे लक्ष लागले आहे.
यंदा मराठवाड्याला महापूराचा जबर फटका बसला आहे. शिवारामध्ये गुडघाभर पाणी साचून राहिले आहे. पाणी निघून जाऊन ओल सुकेपर्यंत ऊस तोडणी करता येणार नाही. त्यामुळे मराठवाड्यातील कारखाने लवकर सुरू होण्याची चिन्हे नाहीत. गेल्या आठवड्याभरात मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे तेथील सर्व प्रकारच्या पिकांना फटका बसला आहे. तेथील कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करावेत, अशी मागणी विस्माने केली आहे. ‘विस्मा’चे अध्यक्ष आणि नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी याविषयी साखर आयुक्त तसेच सरकारकडे प्रयत्न चालवले आहेत. सरकारने परवानगी दिली तरी कारखाने या मुदतीत सुरू होणे अशक्य आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात उलट स्थिती आहे. सीमाभागातील कारखान्यांच्या हद्दीतील २५ ते ३० लाख टन ऊस कर्नाटकमधील कारखाने पळवतात, असा कारखानदारांचा आक्षेप आहे. हा धोका टाळण्यासाठी यावर्षीचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू व्हावा असा प्रयत्न सुरू आहे. आता मंत्री समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा सुरू असल्याचे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.