छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागात ऊस तोडणी कामगार महिला, मुलांच्या विविध योजनांसाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ऊसतोड कामगार महिला आणि त्यांच्या मुलांच्या प्रश्नांसंबंधी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन महिन्यांपूर्वी येथे बैठक घेतली होती. त्यानुसार, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त कामगार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, प्रादेशिक अधिकारी ऊसतोड कामगार महामंडळ, जिल्हा पुरवठा अधिकारी, सदस्य सचिव म्हणून जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांची समिती सर्व जिल्ह्यांत स्थापन करण्यात आली.
याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, ऊसतोड कामगार महिलांच्या न्याय्य हक्कांचेन रक्षण व्हावे, त्यांचे मूलभूत अधिकार जपले जावेत यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. कंत्राटदारांच्या जाचक अटींमुळे महिलांच्या आरोग्याचे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये. कायद्यानुसार मिळणारे समान वेतन, मातृत्व रजेचे लाभही त्यांना मिळायला हवेत. प्रशासनाने सजग आणि सक्रिय राहण्यासाठी या समित्यांची स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणी समितीच्या कामकाजावर आयोगाचीही देखरेख राहणार आहे. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शाळेची सुविधा तसेच त्यांच्या पोषणाची काळजी याबाबत समितीने काम करावे, अशा सूचनाही आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.